सांगलीत प्रेम प्रकरणाच्या वादातून एकाची हत्या

24-02-2019

सांगली

खानापूर येथील जाधववाडीत मित्राच्या प्रेम प्रकरणाचा वाद मिटवण्यासाठी गेलेल्या मित्राला आपलाच प्राण गमवावा लागला. या प्रेमप्रकरणातून प्राण गमवावा लागलेला युवक खानापूर युवा सेना प्रमुख होता.

यावेळी झालेल्या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पिता-पुत्रास अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी,  की आदिनाथ भोसले व प्रमोद भगत यांच्यात एका मुलीला प्रपोज केल्याच्या कारणावरून शुक्रवारी जाधववाडी येथे वाद सुरू होता. याची माहिती प्रमोदचा मित्र व खानापूर युवा सेना प्रमुख आकाश भगत याला मिळाली.

हा वाद मिटवण्यासाठी आकाश भगत, विपुल जाधव व त्याचे मित्र जाधववाडी येथे पोहोचले होते. यावेळी दोन्ही गटात जोरदार वादावादी झाली. आकाश भगत व विपुल जाधव यांच्यावर आदिनाथ भोसले, त्याचे वडील यांनी अन्य एकाच्या मदतीने चाकूहल्ला केला. या हल्ल्यात आकाश भगत आणि विपुल जाधव हे गंभीर जखमी झाले. आकाशचा शनिवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.