चंद्रबाबू नायडू परदेशात,टीडीपीचे राज्यसभेचे ४ खासदार भाजपात

21-06-2019

नवी दिल्ली – सध्या परदेशात वेळ घालवत असलेले तेलगू देसम पार्टीचे प्रमुख आणि आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांना मोठा धक्का बसला आहे. टीडीपीच्या चार राज्यसभा खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.  भाजपमध्ये सामील झालेल्यांमध्ये सीएम रमेश, टीजी व्यंकटेश, जी. मोहन राव आणि वायएस चौधरी या राज्यसभा खासदारांचा समावेश आहे.
 
या चार खासदारांनी राज्यसभेत टीडीपी भारतीय जनता पक्षात विलीन करण्याचा प्रस्ताव पास करून याची माहिती राज्यसभेचे सभापती वैंकय्या नायडू यांना दिली.  राज्यसभेत टीडीपीचे एकूण सहा खासदार होते. त्यापैकी टीडीपीचे आता दोनच खासदार राज्यसभेत आहेत. भाजपमध्ये सामील झालेल्या या खासदारांवर पक्षांतर कायदा लागू होणार नाही. पक्षांतर कायदा केवळ कोणत्याही सभाग्रहातील पक्षाच्या एकतृतीयांश सदस्यांना एका पक्षातून दुसऱ्या पक्षात सामील होण्याचा अधिकार देतो. त्यामुळे टीडीपीच्या त्या चार खासदारांवर हा कायदा लागू होणार नसून ते खासदारपदी कायम राहणार आहेत.
 
टीडीपीचे राज्यसभा खासदार सीएम रमेश, टीजी व्यंकटेश, जी. मोहन राव आणि वायएस चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊ भाजपमध्ये सामील होत असल्याचे जाहीर केले आहे. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांनीच या खासदारांना पक्षात प्रवेश दिला आहे. टीडीपी प्रमुख चंद्रबाबू नायडू कुटुंबियांसमवेत परदेशात असताना या खासदांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
 
यावर चंद्रबाबू नायडू म्हणाले की, आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दौरा मिळविण्यासाठी आम्ही भाजपशी लढलो.  त्यासाठी केंद्रीयमंत्रीपद देखील सोडले.  त्यामुळे टीडीपीला कमकुवत करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांची आम्ही निंदा करतो. तसेच टीडीपीसाठी असं संकट काही नवीन नाही. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी निराश होऊ नये, असं आवाहन चंद्रबाबू नायडू यांनी केलं आहे.

Related News